Eknath Shinde Vs Aditya Thackeray In Worli Koliwada : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे हे आज मुंबईच्या वरळीतील कोळीवाड्यात आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

आज नारळी पोर्णिमा आहे, त्यामुळे नारळी पोर्णिमेचा सण कोळीबांधवांबरोबर साजरा करण्याच्या अनुषंगाने आमदार आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झाले होते. तसेच नारळी पोर्णिमेचा सण कोळीबांधवांबरोबर साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वरळीतील कोळीवाड्यात दाखल झाले होते. मात्र, दोन्ही नेते एकाच वेळेला वरळीत आल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणाहून निघत असताना त्या ठिकाणी आदित्य ठाकरे दाखल झाले. दोघांमध्ये अगदी काही फुटांचं अंतर राहिलं होतं. पण एकाच वेळी दोन्ही नेते एकाच ठिकाणी आल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिलालं. मात्र, त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि परिस्थिती निवाळली.

आमदार आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“वरळीत खूप पर्यटक येत असतात. पर्यटक येतात हे चांगलं आहे. अनेक लोक अशा प्रकारे आजूबाजूने जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. मी फक्त पाहत होतो की काय सुरू आहे? बाकी काही नाही”, असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

काँग्रेसच्या बैठकीतील फोटोबाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. या बैठकीसाठी राज्यातून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे नेते देखील सहभागी झाले होते. दरम्यान या बैठकीवेळी उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “कोन्ही कुठे बसायचं हा आमचा निर्णय आहे. मात्र, तरीही पुन्हा एकदा सांगतो की भाजपाला काय झोंबलं? आम्ही कुठे बसलो हे नाही, तर त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या कार्यालयातून चालतं, याबाबत राहुल गांधींनी आरोप केले आहेत, त्यामुळे भाजपाला हे झोंबलं”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.