दोन हजारांच्या नोटा या वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. १९ तारखेला हा निर्णय घेण्यात आला. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा कराव्यात अशी मुदतही देण्यात आली आहे. यानंतर या निर्णयावर कडाडून टीका होते आहे. संजय राऊत, अजित पवार, राज ठाकरे यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनीही या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निर्णयासाठी दोष दिला आहे. अशात आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे जे चर्चेत आहे.

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

दोन हजारची नोट ही वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला आहे. ही नोट काही बेकायदेशीर ठरवलेली नाही. ऑक्टोबरपर्यंत वितरणातून ही नोट बाहेर काढायची आहे. ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या नोटा बदलता येईल. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. कुणी काळा पैसा जर जमा करुन ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार आहे. कारण त्याला सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठून? दोन हजारांच्या नोटा किंवा अशा नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा, जो मागच्या वेळीही नोटबंदीनंतर झाला होता. जे बनावट चलन पुश करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून होतो तो हाणून पाडला जातो. एकीकडे जो फेक करन्सी पुश करण्याचा प्रयत्न आहे तो या निर्णयामुळे त्यावर आळा बसेल. ज्यांनी नोटा जमा करुन ठेवल्या असतील त्यांना आता तपशील द्यावा लागेल. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.

RBI ने नेमका काय निर्णय घेतला आहे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. १९ मे) २००० रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २००० नोट बाजारात आली होती. आरबीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार २०१९ पासून २००० च्या नोटांची छपाई बंद केली होती. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा निर्णय समोर आल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. मात्र या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.