रानडुकरांकडून शेतीची नासधूस

काही ठिकाणी रानडुकरांकडून मानवी हल्ले होत असल्याने भीतीचे वातावरणही आहे.

पालघर तालुक्यातील शेतकरी त्रस्त; नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाला पाचारण

पालघर : सफाळे परिसरातील १५ ते २० गावे आणि पाडय़ांतील शेतकरी सध्या रानडुकरांमुळे त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांमुळे शेतीची नासधूस होत असून शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. रानडुकरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आले असून या भागांतील शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी रानडुकरांकडून मानवी हल्ले होत असल्याने भीतीचे वातावरणही आहे.

सफाळे, मांडे, विराथन, माकणे, उसरणी, दातीवरे, केळवा रोड, कांळबोळ, रामबाग, माकुणसार, काम्बोडे आदी भागात कंदमुळे, भात पीक, केळी, भाजीपाला यांच्या लागवडीचे रानडुकरांच्या कळपाकडून नुकसान केले जात आहे. विशेषत: ज्या शेतांमध्ये कोंबडी खत किंवा शेणखतचा वापर झाला आहे, अशा शेतांमध्ये रात्रीच्या वेळी रानडुकरांचा कळप येऊन ते सारे शेत खणून किंवा खड्डे करून सर्व लागवड उकरून काढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे.

सफाळेच्या पश्चिमेकडी भागात अनेक गावांमधील रहिवासी नोकरीनिमित्त मुंबई परिसरात स्थलांतरित झाल्याने अनेक ठिकाणी शेती व वाडय़ा ओसाड पडल्या आहेत. अशा वाडय़ांमध्ये या रानडुकरांचा कळप वास्तव्य करत असल्याचे अंदाज बांधण्यात येत आहेत. प्रत्येक गावांमध्ये असे लहान- मोठे पंधरा ते वीस रानडुक्कर राहत असल्याची शक्यता आहे. यापैकी मोठे रानडुकरे ८० ते १०० किलो वजनाची असून मध्यरात्रीनंतर शेतामध्ये घुसून नुकसान करत असल्याचे माकुणसार येथील शेतकरी चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले. काही प्रसंगी रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्याचे येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी शेती व बागायतीची लागवड करत असतो. संपूर्ण शेतीच्या जागेला तारेच्या कुंपणाने वेढून घेणे आर्थिकदृष्टय़ा शेतकऱ्यांना शक्य नसल्याने अनेकांनी काटेरी कुंपण शेतकऱ्यांनी लावले आहे. ज्या शेतीमध्ये सहजपणे खोदकाम करणे शक्य नाही, अशा शेतीच्या ठिकाणी रानडुकरे मोठमोठे खड्डे व चरी खणत असल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे पर्यटन व जेवण बनवण्याच्या स्थानिकांच्या व्यवसायाला या भागात मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने या ठिकाणी शेत कामगार मिळणे खूप कठीण व महागडे होत आहे. अशा परिस्थितीत रानडुकरांकडून होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Destruction of agriculture crop by wild boars zws

ताज्या बातम्या