गेल्या दोन दिवसांपासून एक जाहिरात महाराष्ट्रातील राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी आली आहे. ही जाहिरात आहे देवेंद्र फडणवीसांची. महाराष्ट्रातील सर्व अग्रणी मराठी व इंग्रजी दैनिकांसह टीव्हीवरील चॅनल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरदेखील ही जाहिरात सातत्याने दिसत आहे. ‘देवाभाऊ’ हा एकच शब्द या जाहिरातीत दिसत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी फुलं अर्पण करत असल्याचं या जाहिरातीत दिसत आहे. पार्श्वभूमीवर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणाही ऐकू येत आहेत. पण जाहिरात नेमकी कुणी दिली? यावर सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.

रोहित पवारांचं ट्वीट, बावनकुळेंचं उत्तर!

या जाहिरातीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. एकीकडे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे अशा प्रकारे जाहिरातींवर वारेमाप खर्च योग्य की अयोग्य? यावर विरोधकांनी रान उठवलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल केला आहे.

“मा. बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा, आमचा आक्षेप नाही. पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

“जर ही जाहिरात भाजपाने दिली नाही तर…”

“या जाहिराती भाजपाने दिल्या असतील तर भाजपाने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?” अशा शब्दांत रोहित पवारांनी थेट बावनकुळेंनाच लक्ष्य केलं आहे.

“या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर”, असं आव्हानही रोहित पवारांनी केलं आहे.

“रोहित पवारांनी मोठ्ठा शोध लावलाय”

दरम्यान, रोहित पवारांच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळेंनी एक्सवर पोस्ट करून उत्तर दिलं आहे. “श्री रोहित पवारजी, फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा. अन्यथा राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध”, असं आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे.

त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची निनावी जाहिरात नेमकी कुणी दिली? या प्रश्नाच्या अनुषंगाने सत्ताधारी व विरोधकांमध्ये आता चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे.