देवदासी, विधवा, निराधार महिलांचे मानधन, पोतराज, आराधी, भजनी, वासुदेव यांच्या प्रश्नी निलंगा तालुक्यातील देवदासी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील टाऊन हॉलच्या मदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा नेण्यात आला. निराधारांना घरकूल मिळालेच पाहिजे, निराधारांचे पगार वेळेत झालेच पाहिजेत असे महिलांच्या हातातील फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. आराधी महिलांनी हिरव्या साडय़ा, तर भजनी मंडळाच्या महिलांनी केशरी रंगाच्या साडय़ा परिधान केल्या होत्या. मोच्रेकरी महिलांनी ड्रेस कोडचा वापर करीत अन्यायग्रस्त महिलांचा आकडा निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करून सर्व गरजूंना घरकूल मंजूर करावे, गरजूंना बीपीएलचे रेशनकार्ड देऊन २ रुपये किलो दराने स्वस्त धान्य व प्रत्येकी ५ लिटर रॉकेल द्यावे, शाळकरी मुलींना शिष्यवृत्ती वाटप करावे, ग्रामीण भागात गरजूंना शौचालय बांधून द्यावे, पोलीस तसेच एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा म्हेत्रे, श्रीमंत तेलगावे, अरुण बिराजदार, लक्ष्मी बिराजदार, मीरा सूर्यवंशी, रेणुका कोरे, आंबुलगा सरपंच मीना अंबुलगे आदींसह ३ हजार महिलांचा सहभाग होता.