पवनार परंधाम आश्रम परिसराच्या सौदर्यीकरणाची बाब गांधीवादी व शासनातील संघर्षांचे कारण ठरत असल्याची चिन्हे आहे. या परिसरात पर्यटन क्षेत्र उभारल्याल पवनारचे पावित्र्य कमी होईल, असा गांधीवाद्यांचा मुख्य आक्षेप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेवाग्राम विकास आराखडा शासनाने मंजूर केला असून त्यात ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या वास्तूंचा विकास करतांना सेवाग्राम-पवनार-वर्धा अशा त्रिमितीतून नवा आराखडा तयार झाला. सेवाग्राम आश्रमातील कामांचे मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनही केले आहे. मात्र पवनार विकास आराखडा वादाचा ठरू लागताच शासनाने आखडती भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.धाम नदीकाठच्या परंधाम आश्रम हा पर्यटनस्थळ परिसर म्हणून विकसित करण्याची शासनाची भूमिका आहे. ४० कोटी रूपये खर्चून प्रथम टप्प्यात काही कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी परंधाम आश्रम व महामार्गालगतच्या जागेची निवड झाली आहे. विनोबा समाधी, गांधी रक्षा केंद्र, परंधाम आश्रम, केंद्रस्थानी राहणार आहे. हा नदीच्या उत्तरेचा भाग व दक्षिणेकडील मंदिराचा परिसर असा नदीच्या दोन्ही तीराकाठी सौदर्यीकरणाचा प्रस्ताव आहे. सध्या परिसरात गांधीप्रेमी व भाविक मंडळीचा राबता आहे. पण नव्या सोयी निर्माण झालेल्या नाही. वाहने ठेवण्याचा गोंधळ, नदीपरिसरात कचरा, अतिक्रमण, उठाठेवी पर्यटकांचा गोंधळ, जमिनीची धूप, नदीतील पाण्याचे प्रदूषण व अन्य बाबी या ऐतिहासिक परिसरास विद्रूप करणाऱ्या ठरतात. याच बाबी दूर करण्यावर कटाक्ष ठेवून आराखडा तयार झाला. प्रस्तावित  आराखडय़ात हा सार्वजनिक परिसर पर्यावरणपूरक करतांनाच गांधी-विनोबांच्या विचारांना प्रतिबिंबित करणारा ठरेल, असे ठळकपणे नमूद आहे. परिसर प्रदूषणमूक्त करणे, नदीकाठ आल्हाददायी करणे, पूरनियंत्रक रेषेची स्थितीपाहून नदीकाठ उंचावणे, प्रदूषित पाण्याचे शुध्दीकरण, धार्मिक विधी व नदीत होणाऱ्या अन्य कामांचे जागापालट, असे काम होणार आहे. नदीकाठी हरितपट्टा तयार करतांना बारमाही हिरवेगार राहणाऱ्या झाडांची लागवड केल्या जाईल. या पट्टय़ालगत योगा व तत्सम उपक्रमांसाठी जागा राखीव ठेवण्याचे सूतोवाच आहे. हा संपूर्ण परिसर एका मुख्य प्रवेशद्वाराशी जोडला जाईल. पर्यटकांची सुरक्षा तसेच परिसरावर निगराणी ठेवण्यासाठी ‘एन्ट्रंस प्लाझा’ तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. परिसरात ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महामार्गापलिकडेच सर्व वाहने ठेवण्याची व्यवस्था राहील. विविधरंगी कारंजी, स्वयंचलित पाणीपुरवठा, स्प्रिंकलर, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे व अन्य सोयी प्रस्तावित आहेत. बंगलोरच्या ‘एन्व्हायरो डिझायनर’ कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. हे स्थळ पर्यावरणपूरक हिरवेगार करतांनाच पर्यटनस्नेही तसेच नदीचे पावित्र्य जपणारे व गांधी-विनोबांच्या विचारांचा आदर्श मांडणारे राहील, असा दावा कंपनीने केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development issues about pavnar vinoba bhave ashram
First published on: 05-01-2018 at 01:36 IST