गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. आज सकाळी या चर्चांना पुन्हा उधाण आले. त्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखीये होता है क्या…”

दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर सध्या एक पत्र व्हायरल झाले आहे. हे पत्र अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना पाठवले असल्याचे सांगितले. या पत्रामध्ये अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे दिसून येते.

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना दिलेले पत्र

ashok chavan quit congress
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे व्हायरल झालेले पत्र

भाजपा पक्ष सर्वांसाठी खुला – बावनकुळे

अशोक चव्हाण यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी यापूर्वीच सांगितले आहे की, काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहे. त्यांच्यात अनेक अंतर्गत वाद आहेत. तसेच नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची केंद्रीय नेतृत्वात क्षमता नाही. त्यामुळं अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असेल तर त्याचे कारण काय, हे तपासले पाहीजे. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. हे मी याठिकाणी पुन्हा सांगतो.”

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला फायदा होईल का? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षप्रवेश बुथस्तरावरचा असो किंवा राज्यपातळीवरचा त्याचा निश्चितच फायदा होत असतो. तसेच चव्हाण यांचा जर प्रवेश झाला तर आम्हाला आनंदच होईल. काँग्रेसमधील अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी तयार आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी तर निर्णय घेतला आहेच. इतरही नेते लवकरच निर्णय घेतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसला धक्क्यावर धक्के

लोकसभा निवडणुकीच्या आधीच अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. आता अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही घटक पक्ष काँग्रेसला खिंडार पाडताना दिसत आहेत.