अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा तुरुंगातून बाहेर आल्या असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा भायखळा येथील तुरूंगात होत्या. जामीन मिळाल्यानंतर ५ मे रोजी त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनी नवनीत राणा यांची भेट घेतली आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नवनीत राणा यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

त्यानंतर नागपूरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. “नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. पण ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असे माझे मत आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर १२ दिवसांनी त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली. नवनीत राणा यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अटकेनंतर नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. यामध्ये त्यांनी पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याचा आरोपही केला होता. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून माझ्यावर आणि पतीवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटले. पोलीस बंदोबस्तात पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या जातीच्या आधारावर त्यांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.