इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटलेले आहे. याचे पडसाद जगभर उमटलेले आहेत. तर, भारतातही इस्रायल आणि पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चे काढले. गेल्या महिन्यांत जळगावात मुस्लीम समाजाची रॅली निघाली होती. ही रॅली अडवून काही समाजकंटकांनी हमास समर्थनार्थ घोषणा दिल्याची माहिती आज (१२ डिसेंबर) विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी दिली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवशी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा हमासविरोधातील भूमिका स्पष्ट केली.

“८ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात मुस्लीम समाजाची रॅली निघाली होती. या रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती. सर्व पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते. असं असतानाही ही रॅली जैन गल्ली बाजारपेठेत आल्यानंतर काही समाजकंटकांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. हमासचे झेंडेही दाखवले. जळगावसारख्या जिल्ह्यात तांडव केला जातो. तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि पीआय उद्धव धमाळ यांच्यावर उच्चस्तरीय कारवाई करावी”, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली.

हेही वाचा >> देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न? बेहिशेबी रक्कम, धारदार शस्त्रे, स्मार्टफोन अन्…, NIA च्या धाडसत्रात काय सापडलं?

प्रसाद लाड यांच्या मागणीवर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गाझापट्टीत जे काही झालं त्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे. इस्रायलवर हमासने केलेला हल्ला चुकीचा आहे, असं आपलं मत आहे. त्याचवेळी आपण सातत्याने पॅलेस्टाईनच्याही बाजूने उभे राहिलो आहोत. आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने असलो तरी हमासच्या बाजूने नाही. त्यामुळे हमास ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित झाली आहे. कोणी पॅलेस्टाईनचा उदो उदो करत असेल तर ते आपल्या भूमिकेशी सुसंगत आहे. परंतु, कोणी हमासचं उदो उदो करत असेल तर ते भारताला मान्य नाही. दहशतवादी संघटनेला आपलं कोणतंही समर्थन नाही. जे प्रसाद लाड यांनी काही मांडलेलं आहे ते तपासलं जाईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज (दि. ९ डिसेंबर) धाडसत्र राबवून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ४४ ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडून राज्य सरकारच्या गृहखात्याने केलेल्या या कामगिरीबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी केली.