Devendra Fadnavis on Parinay Fuke Bhandara Speech : महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमधील वाद अधून मधून निदर्शनास येत असतानाच भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेला (शिंदे) डिवचलं आहे. ‘शिवसेनेचा बाप मीच’ असं वक्तव्य भंडारा येथील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना परिणय फुके यांनी केलं आहे. फुके यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे) व भाजपात वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या भंडाऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी आज (४ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन फुके यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही प्रसारमाध्यमं अलीकडच्या काळात नेत्यांची वक्तव्ये कापून-कापून दाखवता. ती वक्तव्ये दिवसभर टीव्हीवर दाखवून एकेक दिवस काढता. तुम्ही हा नवीनच प्रकार सुरू केला आहे जो बंद करायला हवा. मला कल्पना होती की तुम्ही मला यावर प्रतिक्रिया विचारणार त्यामुळे मी आधीच या घटनेची माहिती घेतली आहे.

देवेंद्र फडणवीसांची सारवासारव

मुख्यमंत्री म्हणाले, “आमदार परिणय फुके यांनी म्हटलं होतं की ‘कुठल्याही गोष्टीचं श्रेय आईला दिलं जातं. मात्र, काही चुकलं तर बापावर ढकललं जातं, खापर फोडलं जात. भंडाऱ्यातील शिवसेनेचे लोक काहीही झालं तर माझ्यावर खापर फोडतात. मी त्यांचा बाप आहे का?’ फुके यांचं हे वक्तव्य तुम्ही कापून दाखवत आहात. त्यांच्या संपूर्ण वक्तव्याचा अर्थ नीट पाहिला तर शिवसेनेचा बाप मीच आहे असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. खरंतर तसं वक्तव्य करावं की करू नये हा त्यांचा विषय आहे. मात्र, त्यांचं वक्तव्य अर्धं कापून टीव्हीवर दिवसभर दाखवणं बंद करा.”

“सैराट सोडलेल्या वळूला आवरा अन्यथा…”, शिवसेना (शिंदे) आक्रमक

“परिणय फुके शिवसेनेबद्दल (शिंदे) जे काही बोलले ती अहंकारी भाषा आहे. अशा वक्तव्याचा आणि आमदाराचा आम्ही निषेध करतो”, अशा शब्दांत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आमदार परिणय फुके यांनी १२ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी देखील केली आहे. “सैराट सोडलेल्या वळूला भाजपा पक्षश्रेष्ठींनी आवर घालावी, अन्यथा शिवसेना (शिंदे गट) प्रतिउत्तर देणार” असल्याचा दम शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख संजय कुंभलकर यांनी भंडाऱ्यातील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिला.