त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चांनंतर राज्यात हिंसक घटना घडल्या. त्रिपुरा येथील घटनेचा नागरीकांनी एकत्र येऊन १११ ठिकाणी निषेध केला होता. विविध सरकारी अधिकारी, कार्यालयांना निवेदने देण्यात आली होती. मात्र, या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये हिंसक वळण लागलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती. दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

“अमरावतीमध्ये जो काही घटनाक्रम झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. १२ नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो चुकीच्या माहितीच्या आधारे जाणीवपूर्वक राज्यभरामध्ये कारस्थान करुन निघाला होता. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यांची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आल्या. याद्वारे देशभरामध्ये समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघतात हे नियोजीत मोर्चे होते. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्यापाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

“१२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाला काय विचार करुन परवानगी देण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे. या मोर्चाच्या नंतर समाजकंटकांनी ज्याप्रकारे दुकाने आणि लोकांना लक्ष्य केले. यातून दंगल घडवायची होती म्हणून एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्माच्या दुकानांवर हल्ला करण्यात आला. त्यातून अमरावतीची परिस्थिती बिघडली,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“अमरावीतमध्ये १३ तारखेला जी घटना घडली ती १२ तारखेच्या घटनेची प्रतिक्रिया होती. १३ तारखेला झालेल्या हिंसेचे मी समर्थन करणार नाही. पण आता सरकार, अधिकारी आणि अमरावतीचे पालकमंत्री सगळे १३ तारेखेची घटना पुढे आणण्याचे चित्र तयार करत आहेत ते चुकीचे आहे. १२ तारखेची घटना घडली नसती तर दुसऱ्या दिवशीची घटना घडली नसती. त्यामुळे आता सगळी कारवाई १३ तारखेच्या घटनेवर चालली आहे. आम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माला लक्ष करणे आम्हाला मान्य नाही पण त्याचवेळी चुकीच्या घटनेकरता लांगुनचालन होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on amravati tour after violence demands inquiry abn
First published on: 21-11-2021 at 13:26 IST