Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana Isuue : कोल्हापूरच्या नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी (माधुरी) या हत्तीणीला परत आणावं यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करत आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्र व कर्नाटकातील जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे ‘वनतारा’ने (रिलायन्स समूहाचा गुजरातमधील वनप्रकल्प) म्हटलं आहे. मात्र, लोकभावना लक्षात घेता राज्य सरकार आता महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी फडणवीस यांनी सांगितलं की “महादेवी हत्तीणीसाठी आपण काय करू शकतो यावर चर्चा करण्यासाठी आम्ही उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. आम्ही संबंधित लोकांशी बोलणार आहोत.”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नांदणीची हत्तीण व मुंबईतील कबूतरखान्याविषयी (मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबूतरखाना बंद केला आहे.) तोडगा काढण्यासाठी आम्ही उद्या बैठक बोलावली आहे. दोन्ही घटनांमागे न्यायालयाचे आदेश आहेत, आमच्या सरकारने असा कुठलाही आदेश दिलेला नाही. मात्र, आपण जनभावना लक्षात घेतली पाहिजे. यातून काय मार्ग काढता येईल त्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करू. आम्ही या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. तरी उद्या याच्याशी संबंधित लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत. दोन्ही विषयांवर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
मुख्यमंत्री म्हणाले, “कबूतरखाने बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तरी जनभावना पाहून आम्ही बैठक बोलावली आहे. तसेच नांदणी मठाच्या हत्तीणीबाबत सरकार काही करू शकतं का त्यासंदर्भात बैठक घेणार आहोत.”
‘वनतारा’मध्ये महादेवी सुखात; न्यायालयाने आदेश दिल्यास परत करू!
महादेवी हत्तीणीला कोल्हापूरला परत पाठवावे, या मागणीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली असताना ‘वनतारा’ने प्रसिद्धीपत्रक जारी केलं. वन्यजीव विभाग तसेच जैन मठाने याचिका दाखल करून न्यायालयाकडून संमती मिळविली, तर हत्तिणीला परत पाठवले जाईल, अशी भूमिकाही वनताराने घेतली आहे.