राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावरुन राज्यापालांवर टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांवर टीका केलीय. मात्र आता सत्ताधारी पक्षांकडून होत असणाऱ्या या टीकेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.

शरद पवार काय म्हणाले?
आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी राज्यपालांवर टीका केली. “हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्यातील मंत्रीमंडळाला विधानसभा, विधानपरिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. वर्ष होऊन गेला तरी १२ आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ एवढाच आहे की, ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्याचा विचार करावा,” असा टोला पवारांनी लगावला.

नक्की वाचा >> “मी स्वत: डोंबिवलीत येऊन…”; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा

अजित पवार काय म्हणाले?
राज्यपाल हे एक मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना आपल्याकडे सगळय़ांचे लक्ष असते हे लक्षात ठेवावे आणि विचार करून बोलावे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं.

फडणवीसांनी काय म्हटलं?
नागपूर विमानतळावर शरद पवार असतील, संजय राऊत असतील सर्वांच्या वक्तव्यांमधून राज्यपाल हटाओ मोहीमच दिसतेय, असं म्हणत पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी राज्यपालांना मुद्दाम लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलंय. त्यांनी महाविकास आघाडीकडून संविधानात न बसणारं काम केलं जात असल्याचा दावा करत हे काम दाखवून दिल्यावर राज्यापालांना टार्गेट केलं जातंय असा दावा केलाय.

जाणीवपूर्वक टीका केली जातेय…
“मला असं वाटतं की जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायच्या आणि मग राज्यपालांच्याविरुद्ध बोलायचं. एक प्रकारचा नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. मला असं वाटतं की राज्यपाल एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ती संविधानानेच काम करते. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे,” अशी टाका फडणवीसांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तेव्हा राज्यपालांना टार्गेट केलं जातं
तसेच पुढे बोलताना, “सरकार संविधानानुसार काम करत नाहीय. ज्याप्रकारचे कायदे आणि कायदा दुरुस्ती सरकार करत आहे ते कुठेच संविधानाच्या नियमांमध्ये बसत नाहीत. जेव्हा राज्यपाल याकडे लक्ष वेधतात तेव्हा त्यांना टार्गेट केलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे,” असंही फडणवीस म्हणालेत.