Devendra Fadnavis On Sharad Pawar Claim :  काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचं सादरीकरण देखील केलं आहे. दरम्यान राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही काही खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असे शरद पवार म्हणाले आहेत. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवरांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते इतक्या दिवसांनी का बोलत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “मला लक्षात येत नाही की इतक्या दिवसांनंतरच शरद पवारांना राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले? राहुल गांधी ज्या प्रकारे सलीम-जावेदच्या कहान्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोकल्पित कहान्या सांगत आहेत, तशी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना?”

“अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएमबद्दल होते तरी शरद पवार बोलत नव्हते, किंबहुना शरद पवारांनी अनेक वेळा स्पष्टपणे भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं आयोग्य आहे. आणि आता अचानक शरद पवार जे बोललेत, राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय,” असेही फडणवीस म्हणाले.

संभ्रम निर्माण केला जात आहे का?

महापालिका निवडणनुकीच्या तोंडावर विरोधकांकडून मतदार याद्या आणि मदतान प्रक्रिया याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कितीही संभ्रम निर्माण केला तरीही भारताएवढे ‘फ्री अँड फेअर’ निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे. हे सगळे बोलतायत, पण निवडणुक आयोगाने बोलवल्यावर हे कोणी जात नाहीत, निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतलीय, तर चालेल का? तसंच कायदेशीर प्रकरणात जर तुम्हाला शपथपत्र मागीतलं जातंय तर तुम्ही का देत नाहीत? कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खोटं बोलत आहात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई हऊ शकते. म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोकं आहेत.”

शरद पवार काय म्हणाले?

“आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मात्र, आजही मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याआधी दिल्लीत मला दोन व्यक्ती भेटण्यासाठी आले होते. त्या दोन व्यक्तींनी मला सांगितलं होतं की, महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. त्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्या लोकांनी जरी गॅरंटीचं सांगितलं तरी निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. पण अशा प्रकारचे लोक भेटत असतात, त्यामुळे मी त्या दोन लोकांकडे दूर्लक्ष केलं,” असं विधान शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. दरम्यान शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.