Vaishnavi Hagawane Case Nilesh Chavan Arrested: गेल्या काही दिवसांपासून राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात निलेश चव्हाण याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढले आहे. ही अटक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पोलीसांनी अतिशय चांगली कारवाई केली आहे. (निलेश चव्हाण याचा) नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, सीमेवर त्याला पकडलं आहे. योग्य प्रकारचे इंटेलिजन्स मिळवून पोलिसांनी ट्रॅप तयार केला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात जी लोकं आहेत त्या कोणालाही सोडले जाणार नाही. कुठल्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. अतिशय कडक शिक्षा झालीच पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हगवणे कुटुंबाला शस्त्र परवाने देताना नियम डावलण्यात आल्याचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर होत आहे. याबद्दल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अशा प्रकारची तक्रार आली आहे. त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरिता मी सांगितलं आहे. दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा थपासात कुठलीही गडबड करू नये यासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावल्याचे आणि इतर आरोप आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.