Devendra Fadnavis : राहुल गांधी यांनी याच महिन्यात एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने भाजपासह संधान साधून व्होट चोरी केल्याचा आरोप केला होता. हा विषय चर्चेतही आला होता. दरम्यान CSDS ने डेटा देण्यात चूक झाल्याचं म्हटलं आहे. याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“ही खरी गोष्ट आहे की CSDS नी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते आणि आमच्याही योग्य पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला आऱोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. आज सीएसडीएसने ट्वीट करुन माफी मागितली आहे. ते सगळे आकडे मागे घेतले आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांडतांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला मुळीच वाटत नाही. कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसे सीरियल किलर असतात तसे राहुल गांधी सीरियल लायर आहेत. त्यामुळे ते रोज खोटं बोलतील यानंतरही हीच आकडेवारी मांडतील. पण जनतेच्या समोर हे स्पष्ट झालं आहे.” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडीचा उमेदवार हरणार हे त्यांनाही माहीत आहे-फडणवीस
मला वाटतं की खरंतर उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती. कारण इंडिया आघाडीला माहीत आहे की त्यांच्याकडे मतही नाही आणि बहुमत नाही. त्यांचा उमेदवार कोण मला अजून माहीत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष ट्रेन
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष ट्रेन चालवल्या जातात. या वर्षी आम्ही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली होती की तुम्ही जास्तीच्या गाड्या पाठवा. मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे ३६७ ट्रीप त्यांनी मान्य केल्या आहेत. त्याबाबतची माहिती मी सविस्तर देईनच. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर ट्रेन्स उपलब्ध होतील अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईतल्या पावसाबाबत काय म्हणाले फडणवीस?
मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला ४०० ते ५०० लोकांना आपल्याला हलवावं लागले. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दर तीन तासांनी अलर्ट दिले जाणार-फडणवीस
मुंबईतील काही भागात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली काय झालं, हे सगळ्यांना माहिती आहे. बंगालच्या उपसागराच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तो आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे. त्यामुळे इकडे रेड अलर्ट दिला आहे, त्याप्रमाणे मोठा पाऊस पडतो आहे. काही अडचणी निर्माण होत आहेत. शहरांमध्ये आपलं डिझाईन हे नॉर्मल प्लस १० अशी असते. पण अतिवृष्टी झाल्यावर अडथळे येतात. त्यामुळे आपण आता दर तीन तासांनी अलर्ट देत आहोत. कुठे आणि किती पाऊस पडणार, हे लोकांना सांगत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.