Devendra Fadnavis अंबादास दानवे यांचा विधान परिषदतेला कार्यकाळ संपतो आहे. त्यासाठी अद्याप ४४ दिवस बाकी आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत गौरवोद्गार काढत आणि आपल्या खास शैलीत भाषण करत शिवसेनेला चिमटे काढले. अंबादास दानवे हे मूळचे भाजपातले आहेत. काही कारणांमुळे पक्षाने त्यांना सोडलं. त्यानंतर मग अंबादास दानवे हे आमचा त्यावेळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. खरंतर शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे मात्र आता थोडे बदल झाले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच राहुल गांधी हे जोपर्यंत युवा नेते आहेत तोपर्यंत तुम्ही आणि मी आपण दोघंही युवा नेते आहोत असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंबाबत बोलताना शिवसेनेला लगावला.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

“अंबादास दानवे २९ ऑगस्टला अंबादास दानवे निवृत्त होत आहेत. पुढच्या अधिवेशनाच्या आधी ते निवृत्त घेत आहेत. दानवे यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० चा आहे. मी २२ जुलै १९७० चा आहे. पण एक सांगतो जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते आहेत तोपर्यंत आपण युवा नेते राहू शकतो. कारण राहुल गांधी माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठे आहेत. त्यामुळे त्यांना युवा नेता म्हटलं जातं आहे तोपर्यंत आपल्याला चिंता नाही.” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसला लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना आजही आमचा मित्रपक्ष पण..

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंबादास दानवे हे माझ्या पेक्षा लहान आहेत पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत. जरी ते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असले तरीही ते मूळ आमच्या भाजपाचे आहेत. अंबादास दानवे यांचं जीवन भाजपातच सुरु झालं. एक प्रभावी नेते म्हणून काम करत होते. काही वाद झाले आणि पक्षाने त्यांना सोडलं. मग तेव्हाचा आमचा मित्र पक्ष, म्हणजे आमचा मित्र आजही शिवसेना आहेच पण थोडे काही बदल झाले आहेत. त्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. पण त्यांचं राजकीय जीवन भाजपात घडलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केलं. जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्येत त्यांनी एम ए केलं. अपेक्षा होती की ते बातम्या संकलित करतील पण ते बातम्या पुरवणारे झाले. राजकीय क्षेत्रात पत्रकार आणि वकील सगळ्यात जास्त बघायला मिळतात. सभागृहाला एक चांगला नेता मिळाला. भाजपाच्या मुशीत तयार झाल्याने त्यांच्यात चिकाटी, अभ्यासू वृत्ती पाहण्यास मिळते. इतर पक्षांमध्ये असं होत नाही असं नाही. पण १५ वर्षे ते भाजपात होते असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.