महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असे दावे सातत्याने केले जात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यापासून ते काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी असे दावे गेल्या काही दिवसात केले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अगदी सुरुवातीपासून (अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशापासून) अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असं सांगत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गटातील) नेतेही अशी वक्तव्ये करत आहेत.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण काही वेळापूर्वी म्हणाले, “लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आगामी निवडणूक लढवणार नाही. कारण ठाणे जिल्ह्याच्या बाहेर एकनाथ शिंदेंचा फारसा प्रभाव दिसत नाही. भाजपाकडे आता केवळ अजित पवार यांचा पर्याय उरला आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल. १० ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदेंबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील.”

दरम्यान, मुख्यमंत्री बदलाच्या सगळ्या चर्चा आता थांबतील असं वाटतंय. कारण, महायुतील्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या चर्चांवर पडदा टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसरमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे प्रमुख नेते असून तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील.

हे ही वाचा >> “देशासमोर मणिपूरचं सत्य…”, लोकसभेत अमित शाह यांनी विरोधकांना काय सांगितलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटतं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यात वावगं काहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना वाटू शकतं की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. आमच्या पक्षातील लोकांना भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं वाटू शकतं. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही.