Devendra Fadnavis on Sanjay Raut’s book Narkatla Swarg : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं उद्या (शनिवार, १७ मे) मुंबईत प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशित केलं जाईल. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच यामधील मजकूरावरून, राऊतांनी केलेल्या काही दाव्यांवरून मोठा राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत.
दरम्यान, प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधिंनी या पुस्तकातील मजकुराबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता, “मी बालवाङ्मय (बालसाहित्य) वाचत नाही”, अशी खोचक टिप्पणी केली.
कथा-कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही : फडणवीस
संजय राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात ‘राजा का संदेश साफ हैं’ नावाचं एक प्रकरण असल्याचा दावा काही प्रसारमाध्यांनी केला आहे. गुजरात दंगलीसह काही गुन्ह्यांच्या प्रकरणात अमित शाह अडकलेले असताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शाह यांना कसं वाचवलं आणि दोघांमधील कथित भेटीबद्दल सविस्तर लेखण केलं आहे. यावरून मोठं राजकीय वादळ उठलं आहे. याबाबत काही वार्ताहरांनी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर फडणवीस म्हणाले, “मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडून दिलं आहे. कथा-कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. असल्या गोष्टी मी वाचत नाही. तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्यांना (संजय राऊत) सोडून द्या, ते कोणी मोठे नेते नाहीत”.
चित्रा वाघ यांचीही राऊतांवर टीका
संजय राऊत यांना २०२२ मध्ये पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते १०१ दिवस ईडीच्या कोठडीत (आर्थर रोड तुरुंग) होते. या काळात तुरुंगातील अनुभवांबद्दल राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिलं असून ते शनिवारी प्रकाशित केलं जाणार आहे. दरम्यान, या पुस्तकाचं शीर्षक ‘नरकातला स्वर्ग नव्हे तर ‘गटारातील अर्क’ असं पाहिजे होतं, असं वक्तव्य भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.