मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिंदे गटातल्या एकूण १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी पुढच्या १० दिवसांत निकाल लागणं अपेक्षित आहे. राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा गट भाजपाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा थेट ठाकरे गटाकडूनच करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना केलेलं सूचक विधान नव्या चर्चेला कारण ठरलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात लवकरच निकाल?
सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. हा निकाल खंडपीठानं राखून ठेवला आहे. मात्र, येत्या १६ मे रोजी यातील एक न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्याआधीच हा निकाल लागणं अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील १० दिवस प्रचंड राजकीय घडामोडींचे असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘मी पुन्हा येईन’!
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना ‘मी पुन्हा येईन’ असं पुन्हा म्हटलं आहे! बेळगाव दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीसांनी हे विधान केलं आहे.
“पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंग आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.