ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना हा दावा केला आहे की हे सरकार येत्या १५ दिवसात कोसळणार आहे. तशा प्रकारच्या हालचाली दिल्लीत सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाकडून जे काही भाजपाला अपेक्षित होतं तसं काही घडत नाहीये. त्यामुळेच सरकार १५ दिवसात पडेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर अवघ्या काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट?
राजकारणात पण कुस्ती…असं टायटल देऊन देवेंद्र फडणवीस यांनी ४१ सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या ४१ सेकंदांच्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे आक्रमक फोटो आणि कुस्तीची काही दृश्यं आहेत. यामध्ये मल्ल हे एकमेकांशी डाव-प्रतिडाव खेळताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे ट्वीट सूचक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस अजिंक्यच राहणार, तुम्ही तेल लावलेल्या पैलवानाला चीतपट केलंत. अशा प्रकारचे रिप्लाय या ट्वीटवर दिले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटचा अर्थ काय असू शकतो?
तूर्तास तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या ट्विटचा अर्थ राजकारणातही अशीच कुस्ती रंगली आहे इतकाच होतो आहे. मात्र ही कुस्ती म्हणजे त्यांना मविआ विरोधातली म्हणायची आहे की त्यातून आणखी काही सूचित करायचं आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धक्कातंत्र हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणेच धक्का देण्यात देवेंद्र फडणवीस वाकबगार आहेत हे महाराष्ट्राने वारंवार पाहिलं आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार हे भाजपात जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवारांनी स्वतः समोर येत आपण शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाखत देताना २०२४ ला काय आजही सांगितलं तरी मुख्यमंत्री व्हायला मी तयार आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस संजय राऊत यांनी १५ दिवसात हे सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या ट्वीटमुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे ट्वीट सहजच आहे की नव्या भूकंपाची नांदी आहे? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.