Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. या बैठकीसाठी राज्यातून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे नेते देखील सहभागी झाले होते. दरम्यान या बैठकीवेळी उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचा दावा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्याबद्दल फडणवीस यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला, यावर बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, “आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्यामुळे तिथे त्यांचा काय मान-सन्मान आहे, तो आपल्या लक्षातच आलेला आहे. भाषणात खूप म्हणायचं दिल्लीसमोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही आणि आता दिल्लीत काय परिस्थिती आहे… ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे, हे बघीतल्यानंतर थोडं दु:ख होतं, पण ठिक आहे.”
नेमकं काय झालं?
शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले होते. “काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… शिवरायांचा वारसा सांगता ना रे… काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात? बाळासाहेबांनी (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला, तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का? काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे? तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे. त्यांनासुद्धा पुढच्या रांगेत बसवलं होतं. महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उठा,” असे म्हस्के त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते.
आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…
— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 8, 2025
#शिवरायांचा वारसा सांगता ना रे…
खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन
शेवटच्या रांगेत बसलात रे????#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला
अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला
तुम्ही यातलं… pic.twitter.com/9pr7sDwwqX
मस्के यांनी शेअर केलल्या फोटोंमध्ये राहुल गांधी समोर बोलताना दिसत आहेत, तर समोर खुर्च्यांवर काही नेते बसल्याचे पाहायला मिळत आहे. या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे हे मागच्या बाजुला बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावरून आता टीका केली जात आहे.