Devendra Fadnavis : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एका मतदारसंघाचं उदाहरण देत त्याच मतदारसंघात एक लाख मतांची चोरी कशी झाली, निवडणूक आयोगाने कशी भाजपासह तडजोड केली याची उदाहरणं सादर केली. दरम्यान राहुल गांधी यांनी जे आरोप निवडणूक आयोगावर केले त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला गेल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राहुल गांधींचं म्हणणं नेमकं काय?

महाराष्ट्र निवडणुकीत ४० लाख मतांचा घोटाळा झाला. एक काळ असा होता की ईव्हीएम नव्हतं तरीही मतदान प्रक्रियेचे टप्पे तयार करण्यात आले. त्यामध्ये साधारण महिनाभराचा तरी काळ लागला. एक महिन्याचा काळ आणि टप्प्यांमध्ये निवडणूक कशासाठी? लोकसभा निवडणुकीचा काळ आठवा असं राहुल गांधी म्हणाले. आमच्या संशयाला पाठबळ मिळालं तेव्हा महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला. यातला नेमका तर्क आम्हाला सापडत नव्हता.

१ कोटी मतदार पाच महिन्यांमध्ये वाढले-राहुल गांधी

महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळी पाच महिन्यांत इतके मतदार वाढले जे मागच्या पाच वर्षांत वाढले नव्हते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यांत ४० लाख मतदार वाढले. ही बाब आश्चर्यकारक होते. तसंच संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान मोठ्या प्रमाणावर वाढलं. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आम्हाला घवघवीत यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत आम्ही बाहेर फेकलो गेलो. या दरम्यान १ कोटी मतदार संख्या वाढली असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. हे असं कसं झालं याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही मतदारांची यादी मागवली पण ती देण्यास आम्हाला निवडणूक आयोगाने नकार दिला. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं राहुल गांधींना उत्तर काय?

“मला वाटतं मतांची चोरी महाराष्ट्रातही झाली नाही आणि भारतातही झालेली नाही. काही चोरीला गेलंच असेल तर राहुल गांधींच्या डोक्याची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी रोज बोलतात. राहुल गांधी खोटं बोलतात आणि पळून जातात, वेगळी आकडेवारी देतात. मागच्या वेळी सांगितलं महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले. आता सांगितलं एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवं सांगून सनसनाटी आरोप करण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधींना कळलं आहे की त्यांची जमीन आता संपली आहे. बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही त्यामुळे राहुल गांधी कव्हर फायरिंग करत आहेत. अशा प्रकारचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे.”

माझा राहुल गांधींना प्रश्न आहे की…

माझा राहुल गांधींना प्रश्न आहे की तुम्हाला जर मतदार याद्यांमध्ये घोळ दिसतो ना? निवडणूक आयोगाने बिहारमधल्या मतदारांचं काँप्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरु केलंय तर त्याला तुम्ही (राहुल गांधी) विरोध का करता? मी तर २०१२ मध्ये मागणी केली होती. एकीकडे असा विरोध करायचा आणि दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत असं म्हणायचं. एक प्रकारे भारताच्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारतात अराजक तयार झालं पाहिजे अशी मानसिकता राहुल गांधी यांची दिसते आहे. कारण त्यांना त्यांच्या पक्षाचं भविष्य दिसत नाहीये.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिलं आहे.