महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या..फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारची निंदा केली आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज सुरु आहे. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आणि ज्याप्रकारे सरकार सामान्यांकरता नाही, तर सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, काय ते द्याचं राज्य . फक्त आम्हाला काय मिळणार? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल.

ते पुढे म्हणाले, आपल्याला कल्पना असेल गेल्या काही दिवसात काही धाडी पडल्या होत्या आयटी विभागाच्या. त्या धाडीनंतर विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलं होतं, कुठे हजार कोटीची दलाली, कुठे पाचशे कोटीची दलाली, कुठे चारशे कोटीची दलाली. हजारो कोटी रुपयांची लूट चालली आहे, वाटमारी चालली आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला कोणी तयार नाही.