Devendra Fadnavis ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरबांधणी क्षेत्राशी संबंधित परिषदेत (रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांनी विचारमंथन करताना अर्बन नक्षल सुपारी घेऊन काम करणाऱ्यांना म्हणणारच अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. तसंच मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, आशियातील सर्वात मोठा धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प यासह राज्यातील घरबांधणी क्षेत्राला भेडसावत असलेले प्रश्न यावरही त्यांनी भाष्य केलं.

होय आम्ही अशा लोकांना अर्बन नक्षलच म्हणणार-देवेंद्र फडणवीस

‘प्रकल्प वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न केला तर त्यांना अर्बन नक्षल म्हटलं जातं..’ हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुठलाही प्रकल्प वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न केला तर आम्ही म्हणत नाही. पण कुणाकडून तरी पैसे घ्यायचे आणि भारतातले प्रकल्प थांबवायचे असं करणारे लोक अर्बन नक्षलच आहेत. त्यांना आम्ही अर्बन नक्षलच म्हणणार. उदाहरणादाखल सांगतो, सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी सांगितलं की मेट्रो ३ च्या कारशेडसाठी जेवढी झाडं तोडली जाणार आहेत ही झाडं त्यांच्या पूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ८० दिवसांच्या फेऱ्यांमध्ये करेल. तरीही त्या झाडांसाठी पाच पाच वर्षे मेट्रो अडवून ठेवणं यात महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान तर आहेच पण जगाचं पर्यावरणीय नुकसान केल्याबद्दल त्यांना तुरुंगात का टाकू नये? सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या प्रकारच्या अभ्यासानंतर निर्णय देत असेल तरीही खोडा घातला जात असेल तर काय म्हणायचं? आता मेट्रो ३ तयार झाली. मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करत आहेत. बुधवारी दोन लाख लोकांनी प्रवास केला.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चांगल्या लोकांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत-देवेंद्र फडणवीस

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सामाजिक कार्यकर्त्यांसह आहे, जे चांगले आहेत आम्ही त्यांच्या पाठिशी आहे. आपल्याला ट्रान्स हार्बर लिंक तयार करायची होती, त्यावेळी नैसर्गिक काही समस्या होत्या, पक्ष्यांच्या बाबत काही प्रश्न होते आम्ही त्यातून पळून गेलो नाही. आम्ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला नेमलं. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही यातले तज्ज्ञ आहात. तुम्ही आराखडा तपासा, त्यात काय बदल करायचे सांगा. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या. आज स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे कमी झालेली नाही. त्यामुळे अशा लोकांच्या आम्ही सोबत आहोत. पण जे लोक कुणाकडून तरी सुपारी घेऊन सुप्रीम कोर्टापर्यंत जातात ते अर्बन नक्षलच आहेत. त्यांचा आम्ही विरोधच करु.” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह मध्ये दिलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी हे उत्तर दिलं आहे.