देशभरातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर असल्यासंदर्भातील एका सर्वेक्षणाची आकडेवारी नुकतीच समोर आली होती. यावरच विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. आपण हे सर्वेक्षण पाहिले नसल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधण्याबरोबरच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश झाल्यासंदर्भातही भाष्य केलं.

नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे यासंदर्भात तुमचे मत काय आहे असा प्रश्न फडणवीस यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना “हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही. मी तो बघितलेला नाही. पण कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील तर चांगलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोवीडसंदर्भात चांगलं काम केलं पाहिजे एवढीच सध्या अपेक्षा आहे. मुंबईतल्या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतल्या लोकांची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. पुढे बोलताना त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणाऱ्या मुंबईमधील आरोग्य सेवांसंदर्भातील व्हिडिओंचा दाखला देत उद्धव यांना टोला लगावला. “आपण सोशल मिडियावर जाऊन जर मुंबईची अवस्था बघितली तर कोण किती लोकप्रिय आहे हे आपल्या लक्षात येईल. माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत,” असं फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

शिवसेनेला टोला

“शिवसेना आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचंच काम केलं. बरं एका भूमिकेवर ते ठाम राहिले तर ठीक होतं. पण रोज भूमिका बदलयाची हे त्यांचं धोरण. एक दिवस म्हणायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावं ठेवायची, नंतर कुनिर्सात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची असं शिवसेनेचं धोरण आहे त्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही,” असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

काय आहे हे मुख्यमंत्र्यांच्या यादीसंदर्भातील सर्वेक्षण?

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे. उद्धव ठाकरे हे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या सहा मुख्यमंत्र्यांमध्ये केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाहीय.