नागपुरात काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी संबोधित केलं. यावेळी “राजा, महाराजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केली होती,” असं विधान राहुल गांधींनी केलं. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राहुल गांधी काय म्हणाले?
“स्वातंत्र्याची लढाई देशातील नागरिकांनी लढली होती. राजा, महाराजांनी लढली नाही. त्यांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केली होती. स्वातंत्र्याची लढाई इंग्रजांबरोबरच राजा आणि महाराजांविरोधातही होती. राजा, महाराजांचं इंग्रजांशी संगनमत होते. त्यामुळे गरीबांसाठी काँग्रेसनं स्वातंत्र्याची लढाई लढली होती,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
हेही वाचा : “…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”
“महाराष्ट्र आणि देशात कुणी सहन करणार नाही”
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशात अनेक राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. पण, राहुल गांधींनी सांगितलं, ‘देशातील राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती.’ अशाप्रकारे राजघराण्यांचा अपमान करणं अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं हे महाराष्ट्र आणि देशात कुणी सहन करणार नाही.”
हेही वाचा : “महाराष्ट्रातील कार्यकर्ते माझ्यासाठी स्पेशल, कारण…”, राहुल गांधींनी सांगितलं काँग्रेस-महाराष्ट्राचं नातं!
“काँग्रेसची सुक्ष्म रॅली होती”
“नागपुरातील काँग्रेसच्या सभेला महारॅली म्हणता येत नाही. कारण, ती सुक्ष्म रॅली होती. या सभेला कार्यकर्त्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. आलेले लोक राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून गेले. त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कुणी नव्हतं. काँग्रेसनं ‘हैं तयार हम’ असं घोषवाक्य ठेवलं होतं. मात्र, हे कशासाठी तयार आहेत, हे आमच्या लक्षात आलं नाही,” असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला आहे.