पृथ्वी बंधारे, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय तसेच ५५० कोटींचे भूकंप केंद्र, आरटीओ कार्यालय, नुकतेच झालेले १४ कोटींचे एसटी स्टँडचे भूमिपूजन, १७ कोटीचे तहसील कार्यालय यासह भविष्यात होऊ घातलेले एमआयडीसी सारखे प्रकल्प मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड तालुक्यात दृष्टिक्षेपात असल्याने कराड तालुक्यातील प्रस्थापितांची डोकी ठिकाणावर राहिली नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी सांगितले.
हणबरवाडी (ता. कराड) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी युवा नेते धर्यशील कदम, राहुल चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार जगदाळे, सुदाम दीक्षित, बाजार समितीचे संचालक हिंदूराव चव्हाण, सरपंच शहाजी पवार, उपसरपंच पांडुरंग पुजारी, उमेश साळुंखे, संग्राम जगदाळे, बबन शिरतोडे, जगदीश पाटील यांची या वेळी उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, की सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यात भरीव विकास साकारलेला आहे. कराड उत्तरेत झालेली विकासकामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रत्येक चांगली गोष्ट हाणून पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून आणखी प्रकल्प राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही देताना, विकासाच्या आड येणा-यांची योग्यवेळी दखल घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
धैर्यशील कदम म्हणाले, की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून विकासाचे  पर्व सुरू असताना, त्यात कोणी आडवे पडून अपशकून करत असेल तर येणा-या निवडणुकीत त्यांना अपशकून केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी विसरू नये. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे नारळ आम्हीच फोडणार. त्याचे श्रेय तुम्ही घेऊ नका. आमच्यावर टोळधाड आली म्हणून आरोप करणारे आपण राजकारण कोठून करता हे सांगण्याची गरज नसल्याची टीका त्यांनी केली.