“शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका सन्मान त्यांना (पक्ष सोडणाऱ्यांना) भाजपाच्या सात पिढ्याही देणार नाहीत” असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की, “राजकारणाची समज नसताना ज्यांनी राज्यमंत्रीपद दिले, प्रतिष्ठा दिली, एवढं सगळं वैभव अनुभवण्याची संधी दिली त्याच व्यक्तीला काही जण सोडून गेले. अशा गद्दारांना उस्मानाबदची जनता याच मातीत यांना गाडल्याशिवाय राहणार नाही.”

आपल्या भावना व्यक्त करताना मुंडे म्हणाले की, ” राजे गेले, सरदार गेले, सेनापती गेले अभिमान वाटतोय माझ्या या राष्ट्रवादीच्या सच्चा मावळ्यांचा. हे मावळे आजही  शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.  जोपर्यंत श्वासात श्वास आहे तो पर्यंत शरद पवारांचा पुरोगामी विचार या मातीत रूजवल्याशिवाय गप्प बसणार नाही.”

भाजपात दोन गट!

“भाजपाच्या मेगाभरतीवर टीका करताना मुंडे म्हणाले की, आता भाजपातही विभाजन झालंय. भाजपा ओरिजनल असा एक गट आहे आणि भाजपा नवभरती हा दुसरा गट आहे. भाजपाच्या अध्यक्षांची आमच्या मातीत येऊन, पवार यांच्याविषयी बोलण्याची हिंमत कशी होते. पवारांनी महाराष्ट्रात जितकी विमानतळं बांधली तितकी बस स्थानकं सुद्धा गुजरातमध्ये बांधली नसतील” अशी टीका मुंडे यांनी अमित शाह यांच्यावर केली.

“२१व्या शतकातील छत्रपतींचा इतिहास काय असेल तर आपले दैवत शिवाजी महाराज यांच्या घराण्यात फूट पाडणाऱ्या अनाजी पंतांचे नेतृत्व छत्रपतींच्या वारसांनी स्विकारलं. ज्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता स्वाभिमान आहे त्यांचा हा घोर अपमान आहे” अशी खंत मुंडे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde criticized who left ncp in his speech scj
First published on: 17-09-2019 at 20:29 IST