भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज बीडमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी चार वाजता परळी येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे पत्नी रुक्‍मिणीबाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पुत्र, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी पंडितअण्णांवर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचे हृदय केवळ चाळीस टक्के कार्यरत होते. पंडितअण्णांना गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला हदयविकाराचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांना लातूरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रूबी रूग्णालयात नेण्यात आले होते.
बीडच्या राजकारणात पंडितअण्णा मुंडे यांचे नाव गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरीने घेतले जात असे. त्यांनी बीड जिल्हा परिषद, परळी बाजार समितीचे अध्यक्षपद भुषविले होते. याशिवाय, संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे ते संचालक होते. गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात व्यग्र असताना बीड जिल्ह्याची मदार पंडितअण्णा मुंडे यांच्यावर असायची. गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या स्वतंत्र राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. यावेळी पंडितअण्णा मुंडे मुलाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde father pandit anna munde passed away
First published on: 13-10-2016 at 21:16 IST