मागील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत विरोधीपक्ष नेता पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर मुंडे यांना महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, प्रत्यक्षात खातेवाटपानंतर धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्रिपद देण्यात आलं. धंनजय मुंडे यांना सामाजिक सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. आता या संदर्भात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी इंदू मील येथील बहुचर्चित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्रिपद देण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, ‘ कमकुवत मंत्र्यांकडे सामाजिक न्याय खातं देण्याची प्रथा राज्यात आतापर्यंत चालत आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांनी आश्चर्य वाटलं असेल. पण, या खात्यामार्फत सर्वसामान्य आणि गरिब जनतेची कामं तात्काळ होणं शक्य आहे. म्हणूनच राष्ट्रवादीनं मुद्दाम हे खातं धनंजय मुंडे यांना दिलं आहे. मुंडे यांची ग्रामीण जनतेशी नाळ जोडली आहे. त्यांच्या अडचणी मुंडे यांना माहित आहे. ते चांगल्याप्रकारे त्यांच्या समस्या सोडवू शकतात.’

सामाजिक न्याय मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे पहिल्यांदाच आलं आहे. या खात्याची जबाबदारी मिळाल्यामुळे धनंजय मुंडे आनंदी असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

डॉ. आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक दोन वर्षात उभं राहणं शक्य
डॉ. आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक येत्या दोन वर्षांमध्ये उभं राहणं शक्य आहे असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. गर्दीच्या काळातही स्मारकाची काळजी घ्यावी लागेल. या स्मारकाला आणखी विलंब होऊ नये अशी याची काळजी घ्यावी लागेल असाही सल्ला शरद पवार यांनी दिला. न्यूयॉर्कमधे गेल्यावर जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लोक जातात अगदी तसेच इंदू मिलमधे डॉ. आंबेडकर यांचं स्मारक पाहण्यासाठी लोक आले पाहिजेत असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.