सरकारने कर्जमाफीची घोषणा करून काही महिने लोटले तरी शेतकरी मात्र ऑनलाइनमध्येच अडकला आहे. ही कर्जमाफी फसवी असल्याचे आपण सुरुवातीपासून सांगत असल्याने काही दिवसात ते स्पष्ट होईल. मागच्यावर्षी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अद्याप मिळालेले नाही. तर यावर्षी परतीच्या पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान केले असून सरकारने तत्काळ पंचनामे करावेत आणि दोन्ही वर्षांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आपण सरकारकडे केली असल्याचे सांगत सरकारविरोधात येत्या २३ ऑक्टोबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे दिली.
बीड येथील राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रमुख विषयाबरोबरच महागाई आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महामोर्चा काढला जाणार आहे. तर बीड जिल्हा परिषदेचे तब्बल पावणे दोनशे कोटी रुपये जिल्हा बँकेत अनेक दिवसांपासून अडकल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद आता एकाच नेतृत्वाच्या ताब्यात असल्याने जिल्हा परिषदेचे पैसे द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. मागच्यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान द्यावे आणि यावर्षी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली.
२३ रोजी महामोर्चा
महागाई, पेट्रोल दरवाढ या विषयावर सरकारच्या विरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर २३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा बँक व जिल्हा परिषद एकाच नेतृत्वाच्या ताब्यात असल्यामुळे जिल्हा परिषदेचे बँकेत अडकलेले पावणे दोन अब्ज रुपये तत्काळ परत द्यावेत, अशी मागणीही मुंडे यांनी केली.