राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह असताना धुळ्यात मात्र या सणाला गालबोट लागले. फटाके फोडण्याच्या वादातून १९ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे येथे राहणारा दिनेश चौधरी (वय १९) हा तरुण गुरुवारी संध्याकाळी मनमाड जीन चौकात फटाके फोडत होता. याच दरम्यान कृष्णा शिंदे, तुषार शिंदे, करण सरोदे आणि भय्या सरोदे हे चौघे तिथे पोहोचले. घराजवळचा परिसर सोडून चौकात फटाके उडवतोस, असे सांगत त्यांनी दिनेश चौधरीला बेदम मारहाण केली. आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने दिनेशवर वार केले आणि तिथून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील तुषार शिंदे आणि भय्या सरोदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित दोघे अजूनही फरार आहेत. या दोन्ही गटांमध्ये याआधीही वाद झाला होता. गुरुवारी फटाके फोडण्याचा वाद हे हत्येसाठी निमित्त ठरले, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule 19 year old killed over burning fire cracker on road
First published on: 20-10-2017 at 21:00 IST