शहरातील सराफ बाजार बंद ठेवण्यावरून सुवर्णकारांच्या दोन संघटनांतील मतभेद सोमवारी उघडकीस आले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेने सोमवारी बाजार बंदचे आवाहन केले होते. मात्र ते झिडकारून लावत सराफ व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. शहरातील शंभर टक्के व्यवहार सुरू होते, असा दावा सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष रणजित परमार यांनी केला. दरम्यान सायंकाळी झालेल्या सराफ व्यापारी संघाच्या तातडीच्या बैठकीत बंदच्या आवाहनाचा पाठपुरावा करणारे अमोल ढणाल व सुरेंद्र पुरवंत या सासरे-जावयाचे सदस्यत्व स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील महिन्यात होणाऱ्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठरावा संमत केला जाणार आहे.
कस्टम विभाग, डीआयआरटी या विभागाकडून सराफ व्यावसायिकांना संरक्षण मिळावे, त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळावी या मागणीसाठी अखिल भारतीय बुलियन व ज्वेलर्स असोसिएशनने देशव्यापी सराफी दुकान बंदचे आंदोलन पुकारले होते. मात्र या आवाहनाला कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला नाही. सध्या लग्नसराई सुरू असल्याने आणि होळी, गुढीपाडवा यांसारखे सण जवळ असल्याने ग्राहकांची गैरसोय होणे अयोग्य आहे, असे सांगत बंदमध्ये न उतरण्याचा निर्णय शहरातील सराफांनी घेतला असल्याची माहिती सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष परमार यांनी दिली. कस्टम व तत्सम विभागाकडून सराफांना निश्चितपणे त्रास होत आहे. त्यासाठी पाठपुरावाही केला जात आहे, पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता अंधुक आहे. निवडणुकीनंतर या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
सुवर्णकारांच्या संघटनांत बाजार बंदवरून मतभेद
शहरातील सराफ बाजार बंद ठेवण्यावरून सुवर्णकारांच्या दोन संघटनांतील मतभेद सोमवारी उघडकीस आले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेने सोमवारी बाजार बंदचे आवाहन केले होते.
First published on: 11-03-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Differentiate on market close in jewellery organisation