अलिबाग : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पुस्तक पूजनावरून दोन गटांत वाद निर्माण झाला. पुस्तक पूजनाच्या बहाण्याने गडावर अस्थिविसर्जनाचा घाट घातला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुस्तके आणि पूजनासाठी आणलेले साहित्य, राखसदृश्य घटक ताब्यात घेतले. या राखेचे न्यायवैद्यक पृथक्करण केले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 किल्ले रायगडावर बुधवारी काही जण शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पुस्तक पूजन करत होते. मात्र यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे तिथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी जाब विचारला यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना रोखले. पुस्तक आणि पूजनासाठी आणलेले साहित्य ताब्यात घेतले. पुस्तक पूजनाच्या निमित्ताने अस्थिंचे शिवसमाधी जवळ विसर्जन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप काही शिवप्रेमींनी केला. त्यामुळे काही काळ गडावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

अस्थी चंदनात मिसळून त्या रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर विसर्जन करण्याचा प्रयत्न काही जणांचा डाव होता. तो आम्ही उधळून लावला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.              – पूजा झोळे, मराठा क्रांती मोर्चा

‘दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. ताब्यात घेतलेले वस्तूंचे न्यायवैद्यक पृथक्करण करण्यासाठी पाठवत आहोत. अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल.   – अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधिक्षक रायगड</p>