अहिल्यानगर: संगमनेर बुद्रुक येथील गट क्रमांक १०६ मधील जमिनी प्रत्यक्ष कब्जेदाराच्या नावे करा, असा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, बुधवारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे मालकी हक्कावरून सुरू असलेला वाद संपुष्टात येणार आहे. या जमिनीवरील पोकळीस्त नोंदी व इतर हक्काच्या नोंदी रद्द करून जमिनी प्रत्यक्ष कब्जेधारकांच्या नावे होणार आहेत.
मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यावेळी उपस्थित होते. अभिलेखांच्या तपासणीनुसार, १९०० ते १९४५ या काळात गोविंदराम बाळकिसन हे या जमिनीचे मूळ मालक म्हणून नोंदणीकृत होते. त्यानंतर, १९४६ ते १९५६ दरम्यान नारायण सावळेराम मंडलिक आणि महादू सावळेराम मंडलिक यांची संरक्षित कुळ म्हणून नोंद झाली. १९६१ मध्ये, गोविंदराम बाळकिसन मणियार यांच्या इस्टेटीचे रिसीव्हरसह सहा जणांना विकली. यानंतर त्यांनी आपापसात जमिनीचे वाटप केले.
दरम्यान, बिहारीलाल चुनीलाल मणियार यांचा १/१२ हिस्सा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने कायम ठेवण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष कब्जा नसल्याने त्यांची इतर हक्कात नोंद होती. तसेच राधाकिसन, पन्नालाल आणि गंगाकिसन गोविंदराम मणियार यांनाही दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकी १/५ हिस्सा कब्जेदार सदरी नोंदवण्यात आला होता.
आता या सर्व नोंदींचे अवलोकन करून, प्रत्यक्ष कब्जा असलेल्या व्यक्तींना जमिनीचा कायदेशीर हक्क मिळणार आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना महसूलमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.