रायगड जिल्ह्य़ातील कबड्डीचे मैदान सध्या राजकारणाचा आखाडा बनले आहे. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वर्चस्वावरून शेकाप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली असून दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेले आहेत. जिल्ह्य़ाच्या कार्यकारिणीत स्थान न मिळालेल्याने दुखावलेल्या राष्ट्रवादीने जिल्हास्तरीय हौशी कबड्डी संघटना शेकापची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत संघटनेवर शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आमदार जयंत पाटील यांची अध्यक्षपदी तर आस्वाद पाटील यांची कार्यवाहपदी वर्णी लागली.
मात्र संघटनेत स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या राष्ट्रवादीने आता वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. जिल्हा कबड्डी असोसिएशनला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने जिल्हास्तरीय हौशी कबड्डी असोसिएशन स्थापण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रायगडच्या साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात संघटना स्थापन करण्यासाठी रीतसर अर्ज दाखल करण्यात आला आहे. हौशी संघटनेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते अवधूत तटकरे तर कार्यवाहपदी राष्ट्रवादीचे महेंद्र दळवी असणार आहेत.
दरम्यान, हौशी संघटनेच्या अर्जावर जिल्हा कबड्डी असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. आमची संघटना ही जिल्ह्य़ातील अधिकृत संघटना आहे. या संघटनेला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची मान्यता प्राप्त आहे. अशा वेळी दुसरी संघटना जिल्हास्तरीय कबड्डी असोसिएशन रजिस्टर करू नये, असा आक्षेप रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह आस्वाद पाटील यांनी घेतला आहे. राष्ट्रवादीने हौशी संघटना रजिस्टर करण्यासाठी अर्जावर बोगस सह्य़ा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडून हौशी संघटना रजिस्टर करण्यासाठी देण्यात आलेले पत्रही खोटे असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, एखादी संघटना रजिस्टर करण्यासाठी असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची आम्ही पूर्तता केली आहे. हौशी कबड्डी असोसिएशन स्थापन व्हावी यासाठी साहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे अर्जही केला आहे. त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती हौशी संघटनेचे कार्यवाह महेंद्र दळवी यांनी दिली.
महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्य़ातील १५ तालुक्यातील कबड्डी असोसिएशनचा पाठिंबा आमच्या हौशी संघटनेला असल्याचा दावा या वेळी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडे आमच्या संघटनेला मान्यता द्या अथवा जुन्या संघटनेची मान्यता काढून घ्या, असा अर्ज आम्ही केलेला नाही. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या संघटनेला आमच्यावर आक्षेप घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसल्याचे महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले.
शेकाप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा राजकीय वाद आता कबड्डीच्या मैदानात येऊन पोहचला आहे.
दोन्ही पक्ष संघटनेतील सत्तासंघर्षांसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात काय निर्णय लागणार यावर जिल्ह्य़ातील कबड्डीचे भवितव्य ठरणार आहे हे मात्र नक्की.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2013 रोजी प्रकाशित
रायगडात कबड्डी असोसिएशनच्या स्थापनेवरून शेकाप-राष्ट्रवादीत जुंपली
रायगड जिल्ह्य़ातील कबड्डीचे मैदान सध्या राजकारणाचा आखाडा बनले आहे. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वर्चस्वावरून शेकाप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली असून दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेले आहेत.
First published on: 20-03-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disputes between shekap and ncp on raigad kabaddi assocation