जालना : राज्य शासनाच्या २ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांची जिल्हा पातळीवरील कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेस जिल्ह्यातील गाव पातळीवरील चौकशी समितीचे सदस्य असलेले ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.
महसूल विभागातील त्याचप्रमाणे कृषी विभागातील जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते. हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाच्या संदर्भात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृत्रिम बुध्दीमत्ता, ई-ऑफिस, जीवन कौशल्य विकास आणि हैदराबाद गॅझिटियर च्या संदर्भात २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबीरही घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून कार्यक्षम आणि उत्तरदायित्व असलेली प्रशासकीय प्रणाली निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणणे, कर्मचाऱ्यांत व्यक्तिमत्व विकास आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे.
प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने गळ्यात स्वतःचे ओळखपत्र घालणे बंधनकारक असल्याचे सांगून मित्तल म्हणाल्या कार्यालयाची आणि परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे. प्रा. बी. वाय. कुळकर्णी, अण्णासाहेब वाघमारे, शरद जोशी, रवीन्द्र सोनवणे यांनी या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले. जिल्हयातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आदींची उपस्थिती या वेळी होती.