Divya Deshmukh becomes Womens World Cup champion : भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहास रचत फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्या महिला विश्वचषक विजेती बनली आहे. यासोबतच तिने आपला ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे आणि आता ती भारताची चौथी वुमन ग्रँडमास्टर झाली आहे. वयाच्या अवघ्या १९ वर्षी दिव्याने हे यश संपादन केले आहे. दिव्याच्या या नेतृदीपक कामगिरीनंतर भारताचा जागतीक बुद्धिबळावर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान दिव्याच्या या यशानंतर राजकीय वर्तुळातून देखील तिचं भरभरून कौतुक केले जात आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिव्याचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांची खास पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी हम्पी आणि दिव्या यांच्यातील सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षण असल्याचे म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, “जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women’s World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल!”
“सामन्याअंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women’s World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद! ??,” असेही शरद पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सार्थ अभिमान – एकनाथ शिंदे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिव्याच्या विजयानंतर पोस्ट केली आहे. “जॉर्जिया देशातील बटुमी शहरात खेळल्या गेलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हम्पीचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंमध्येच होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिव्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिचे तसेच उपविजेती भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी या दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“जॉर्जिया येथे पार पडलेल्या FIDE महिला वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, महाराष्ट्र कन्या दिव्या देशमुख हिनं आत्मविश्वासपूर्ण खेळ आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर विश्वविजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या अभूतपूर्व यशामुळं दिव्या देशमुख हिनं प्रथम भारतीय महिला FIDE विश्वचषक विजेती आणि भारताची ८८वी ग्रॅण्डमास्टर म्हणून आपली नोंद केली आहे. तिच्या या पराक्रमामुळं संपूर्ण देशाचं नाव अभिमानानं उंचावलं आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल दिव्या, तिचे पालक व प्रशिक्षक यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसंच तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!” असे अजित पवार एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“हे दृश्यच खूप सुंदर”
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत दिव्याचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले की, “अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हम्पीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग.”
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “पण दिव्याचं मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा… महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेंव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन…”