मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरु असल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्मालपुरात हा प्रकार घडला असून मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना करत नातेवाईकांना उपचार सुरु असल्याचं सांगून पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हेल्थ केअरचा डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर याला अटक केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

सायरा हमीद शेख असं मृत महिला रुग्णाचं नाव आहे. मेंदू पक्षाघातावर उपचारासाठी २४ फेब्रुवारी रोजी त्यांना आधार हेल्थ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायरा यांचं उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी निधन झालं होतं. मात्र डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर यांने ही माहिती मुलगा सलीम शेख याच्यापासून लपवून ठेवली आणि उपचार सुरु असल्याचं भासवलं.

नगरपालिका नोंदणी विभागात मृत्यू वेळ ८ मार्चला सकाळी११ वाजून ४८ मिनिटांनी झाली असल्याची नोंद आहे. मात्र, डॉक्टरांनी १० मार्चला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह ताब्यात दिला. यामुळे नातेवाईकांना संशय आला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तपास केला असता सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करण्यात आल्याचं समोर आलं. डॉक्टर योगेश वाठारकर याने बनावट कागदपत्रं तयार करून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल तयार केल्याचंही निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत डॉक्टर योगेश वाठारकरला बेड्या ठोकल्या आहेत.