“देशात १४ ऑगस्ट १९४६ मध्ये रक्तपात घडला, हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण केले गेले. पंतप्रधान मोदींनी आता पुन्हा त्याची स्मृती म्हणून हा १४ ऑगस्ट स्मृती दिवस साजरा करण्याचा निर्णय केला. स्मृतीचा अर्थ काय असतो? त्याचा अर्थ म्हणजे पुन्हा आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याचा प्रयत्न करायचा, असा होतो. नरेंद्र मोदींना तो रक्तपाताचा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा का करायचा आहे? पुन्हा या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करायचा आहे का? उत्तर प्रदेशच्या निवडणुका हिंदू – मुस्लिमांच्या वादावरून पुन्हा जिंकायच्या आहेत का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, “म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की ही लढाई सोपी नाही. हिंदू – मुस्लिम हे एक आहेत. पण त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपाची मानसिकता असलेले लोकं हे सातत्याने या देशाला तोडण्याचं, विभाजित करण्याचं, या देशाचं संविधान संपवण्याचं पाप करत असतील तर अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगे बढो आगे बढो नाही… युवकांची ताकद आता या देशद्रोहींच्या विरोधात उभी करण्याचं काम आपण केलं पाहिजे.”

तसेच यावेळी भाषणाच्या सुरूवातीला नाना पटोले म्हणाले की, “सर्वप्रथम मी आपल्या देशासाठी शहीद झालेले आणि सर्व स्वातंत्र्यवीरांना कोटीकोटी अभिवादन करतो. ज्या लोकांच्या बलिदानाने व त्यागाने तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणून या सर्व थोर महत्म्यांची स्मृती, त्यांची आठवण आपण सगळ्यांनी आपल्या मनात तेवत ठेवून आणि नवीन पिढीपर्यंत हा संदेश बलिदानाचा, त्यागाचा आणि काँग्रेसचा पोहचावा यासाठी या कार्यक्रमाची सुरूवात आपण १ ऑगस्टपासून आपण पूर्ण वर्षभर करण्याचा निर्णय घेतला आहे.”

ज्यांचा कधीही त्याग व मानवतेशी संबंध नाही, अशा विचाराचं सरकार देशात…

“देशामध्ये ज्यांचा कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही, ज्यांचा कधीही त्याग व मानवतेशी संबंध नाही, अशा विचाराचं सरकार देशात आलं आणि त्याचा परिणाम मागील सात वर्षांमध्ये आपला देश कसा भोगतोय? सर्व सामान्यांचं जगणं आणि आता आपलं संविधान वाचेल की नाही वाचेल? अशी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे. चीनने सीमा ओलांडून आपल्या देशात प्रवेश केला, मोठ्या कष्टाने, त्यागाने व बलिदानाने आपल्याला मिळालेलं स्वातत्र्य टिकेल की नाही टिकेल? असं आज वातावरण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींचं ट्विटर अकाउंट बंद करण्याचा पाप केंद्रातील दमनशाही सरकारने केलं –

“दिल्लीत एक नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला, दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या म्हणजेच गृहमंत्री अमित शाह यांच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी अत्याचार होतो म्हणून आपले नेते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या परिवारासाठी ट्विटद्वारे संदेश पाठवला. देशात शेतकऱ्यांविरोधात जे तीन काळे कायदे आणले गेले, या कायद्यांचा विरोध राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत तेवढ्याच ताकदीने केलेला आहे. दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असं सांगणारं सरकार, आज युवकांना बेरोजगार करतं आहे. म्हणून बेरोजगारांचा आवाज राहुल गांधी झाले. छोटा व्यापारी उध्वस्त झाला. गरिबांना आता दोन वेळचं जेवण मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून राहुल गांधींनी त्यांचा आवाज बनून सरकार समोर उभा ठाकत, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचं ट्विटर अकाउंटच बंद करण्याचा पाप दमनशाही सरकार जे केंद्रात आहे, त्या भाजपाच्या मोदी सरकारने केले. आवाज बंद करण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. आपण लोकशाहीत आहोत, याचंही भान केंद्र सरकारला नसेल, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता सत्तेसाठी नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि संविधानासाठी लढाई उभी करण्यासाठी काम केलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी मी इथं आलोय.”