सावंतवाडी: गणेश चतुर्थीच्या दिवशी पाण्यासाठी प्लास्टिकच्या बरणीत तोंड अडकलेल्या एका कुत्र्याची तब्बल १७ दिवसांनंतर सुटका करण्यात आली आहे. रॅपिड रेस्क्यू टीम, मंगेश तळवणेकर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी तहानलेल्या या कुत्र्याने एका प्लास्टिकच्या बरणीतील पाणी पिण्यासाठी त्यात तोंड घातले, पण ते त्यात अडकले. तोंड बाहेर काढण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. ग्रामस्थांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना पाहताच पळ काढायचा, त्यामुळे ग्रामस्थही हताश झाले होते.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे कोनापाल येथे हा प्रसंग घडला.अखेर विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांना याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ वन खात्याच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे बबन रेडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून कुत्र्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर, कुत्र्याच्या गळ्यात एक गोल वायझर अडकवून त्याला पकडण्यात आले. त्यानंतर, काळजीपूर्वक ती प्लास्टिकची बरणी कापून कुत्र्याची सुटका करण्यात आली. या बचावकार्यात मधुकर भाईडकर, भारत कोनापालकर, महेंद्र धारगळकर, वेदांत धारगळकर, राज भाईडकर, चिराग तोरसकर, साहिल कोनापालकर, संजय पांढरे आणि प्रमोद पांढरे या स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.