अंबा नदीत आलेल्या डॉल्फिन माशाला यशस्वीरीत्या पुन्हा माघारी पाठविण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. भरतीचे पाणी चढण्यास सुरुवात झाल्यानंतर मध्यरात्री या माशाने पुन्हा समुद्राकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आठ तास सुरू असलेले मिशन डॉल्फिन बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान नागोठणे येथील अंबा नदीत मोठा मासा आला असल्याचे एका स्थानिक मच्छीमाराच्या लक्षात आले. नदीत डॉल्फिन आल्याचे समजताच माशाला पाहण्यासाठी आबालवृद्धांनी नदीकिनाऱ्यावर एकच गर्दी केली. नदीत डॉल्फिन आल्याचे वृत्त वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुंबई येथील कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही यानंतर पाचारण करण्यात आले. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने मिशन डॉल्फिन बचाव सुरू करण्यात आले.
या मोहिमेत नागोठणेसह पाली, वडखळ, पेण, पोयनाड, अलिबाग येथील वन खात्याचे शंभर कर्मचारी व अधिकारी तनात करण्यात आले होते. तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या सूचनेनुसार नागोठणे ग्रामपंचायतीची स्पीड बोट, कोळीबांधवांच्या होडय़ा तसेच इतर साहित्याची तयारी करण्यात आली होती. हा मासा सुरक्षित पकडून त्याला पुन्हा समुद्रात सोडायचा असा निर्णय घेण्यात आला. मात्र मध्यरात्री भरतीचे पाणी भरावयास सुरुवात झाल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली व त्यामुळे या माशाचा परतीचा मार्ग सुकर झाल्याने धरमतर खाडीमाग्रे तो समुद्राकडे माघारी फिरला. नदीच्या परिसरात अधिकारीवर्गाने होडय़ांतून फिरून माशाचा शोध घेतल्यानंतर तो कोठेही आढळून न आल्याने डॉल्फिन समुद्रातच गेला, असा निष्कर्ष काढण्यात येऊन आठ तासांची ही बचाव मोहीम यशस्वीरीत्या संपुष्टात आली असल्याचे वन खात्याकडून जाहीर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dolphin return to sea
First published on: 04-07-2015 at 05:26 IST