जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी भाजपासोबत आलो आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्याच सर्वच उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार आहे, मात्र मागील निवडणुकीत मला तुम्ही पळायला लावले तसे यावेळी करू नका, अशा मिश्किल शब्दांत उदयनराजे भोसले यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विनंती केली.

सातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, माझ्यावर इतक्या केसेस कशा आहेत, असे मला निवडणूक आयोगाने विचारले होते. यावर मी त्यांना सांगितले मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल तर सांगा मी त्यांचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो, असेही ते यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी त्यांनी आपण लोकसभा पोटनिवडणुकासाठी तर शिवेंद्रराजे विधानसभेसाठी १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शेखर चरेगावकर म्हणाले, सातार्‍याचा खासदार हा भाजपचाच व्हावा, ही नियतीची इच्छा होती. विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होवू नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

विक्रम पावस्कर म्हणाले, आगामी निवडणूक ही युध्द म्हणून लढायची आहे. शत्रू पिसाळलेला आहे. लहान पोरासारखं त्यांचं वागणं चालू आहे. आपल्यातील कोणी विरोधात काम केलं तर पायात दगड बांधून त्याला पाण्यात सोडलं जाईल. आम्ही त्यांच्याकडे पुन्हा पाहणार नाही.