विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे जहाज बुडणार आहे. त्यामुळे त्या जहाजावरील ‘उंदीर’ पळू लागले आहेत. सगळय़ाच उंदरांना सरसकट आश्रय दिला तर अवघड होऊन बसेल. झेंडा बदलून तीच माणसे त्या पक्षातून महायुतीत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ती राजकीय बेरीज वाटू शकेल कदाचित. मात्र, त्यांना टाळणे हेच सोयीचे आणि हिताचे असेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमासाठी शेट्टी आले होते.
विधानसभा निवडणुकीत स्वच्छ उमेदवार निवडणे आणि आश्वासक चेहरा देणे जास्त महत्त्वाचे आहे. उमेदवार ठरवताना बऱ्याच वेळा जात आणि बँक बॅलन्स तपासला जातो, हे खरे आहे. पण उमेदवार आश्वासक असावा, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. मराठवाडय़ातील कार्यकर्ते तर भावनिक झाले आहेत. त्यांना आधार देण्याची गरज आहे, असेही शेट्टी म्हणाले.
अर्थसंकल्पापूर्वी मागण्यांचे निवेदन
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करत असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाकडे मंत्रिपदाची कधीही मागणी केली नाही. शिवसेनेच्या १८ जागा असतानाही त्यांना केवळ एक मंत्रिपद दिले आहे. मी तर एकटाच आहे. परिणामी, सत्ता मिळावी यासाठी कधीही महायुतीत गेलो नव्हतो, मात्र शेतीचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी पाठपुरावा करत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असून त्यांना शेतीप्रश्नांविषयीचे निवेदन देणार असल्याचे शेट्टी म्हणाले. या पत्राच्या प्रारूपातील माहितीही दिली. ते म्हणाले, शेतीचा पतपुरवठा व्यापक व्हावा, पीककर्जाबरोबरच अन्य कामांसाठी कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध व्हावे, शेतरस्ते अधिकाधिक व्हावे, यासाठी क्लस्टर योजना राबवावी. साठवणुकीचे केंद्र वाढवावे, शेतकऱ्यांनी त्यांचा माल साठवणूक केंद्रात ठेवल्यानंतर साखरेला ज्याप्रमाणे ८५ टक्के बाजारभावानुसार कर्ज दिले जाते, तसे कर्ज सोयाबीन, हरभरा, तूर व अन्य पिकांना उपलब्ध व्हावे, प्रक्रिया उद्योग व्हावे, भाजीपाला व फळांसाठी रेल्वेमध्ये स्वतंत्र सोय व्हावी, अशा मागण्या या पत्रातून केल्या जाणार आहेत.
शेतीसाठी वाहिलेले पाक्षिक हवे
देशातील पीकपरिस्थितीची माहिती आणि बाजारपेठ याचा अभ्यास शेतकऱ्यांना नसतो. त्यामुळे देशातील पिकांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून सरकारच्या वतीने एक पाक्षिक काढले जावे. ज्यात पीकपद्धती आणि नियोजनावर भर असावा. कोणत्या भागात कोणती पिके घेतली जावीत, हे या पाक्षिकामुळे ठरवता यावे, अशी रचना केली जावी. तसेच डाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांच्या आधारभूत किमतीत घसघशीत वाढ केली जावी. तसे केले तरच रुपया स्थिरावेल, असेही शेट्टी सरकारला सांगणार आहेत.