सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाद निर्माण झालेला बघायला मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी त्यांना काय चर्चा झाली ते विचारले. त्यावर बोलताना उदयनराजे म्हटले की पवार साहेब मोठे व्यक्ती आहेत. आपल्या सगळ्यांना लाज वाटेल इतकं काम ते आजही करतात. काय बोलणार त्यांच्या भेटीबद्दल मी एवढंच म्हटलं की फसवाफसवी करू नका, नाहीतर आपल्यालाही कळतं काय करायचं. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पाहा व्हिडिओ

उदयनराजे भोसले हे कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या भेटीत काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. भेट घेतल्यानंतर त्यांनी फसवाफसवी करू नका असे पवारांना सांगितल्याचे म्हटले आहे. शरद पवार हे आज कर्मवीर जयंती कार्यक्रमासाठी साताऱ्यात आहेत. त्यावेळी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जेव्हा उदयनराजे बाहेर आले तेव्हा त्यांच्याकडून चुकून शरद पवार यांच्या टोयाटो लेक्सास कारमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. चूक लक्षात आल्यावर माझी आणि पवार साहेबांची गाडी एकच आहे असे त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

शरद पवार ज्यावेळी साताऱ्यात येतात त्यावेळी उदयनराजेंची अनुपस्थिती हा राष्ट्रवादीत चर्चेचा विषय ठरतो. मात्र आज शरद पवार यांच्या स्वागतासाठी खासदार उदयनराजे भोसले सर्किट हाऊसच्या बाहेर एका बाजूला आपल्या कार्यकर्त्यांसोबत स्वागत करण्यासाठी उभे होते. जेव्हा शरद पवार या ठिकाणी आले तेव्हा उदयनराजेंनी इतर सगळ्या आमदारांना बाजूला करत शरद पवारांचं स्वागत केलं. त्यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.