शेतकरी आयोग सरकारने आणावा तसेच शेतकऱ्याच्या उत्पादनाला नफ्यातील ५० टक्के वाटा मिळायला हवा अशी माहिती जागतिक कीर्तीचे कृषी शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग अ‍ॅग्रो फेस्टसाठी सिंधुदुर्गनगरी येथे डॉ. स्वामिनाथन आले असता पत्रकारांशी बोलत होते. या वेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, डॉ. रमेश ठाकरे, कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य आदी उपस्थित होते.
देशाच्या एकूण उत्पादनात १४ टक्के वाटा हा शेतीचा आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० ते ५५ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे देशाच्या एकूण उत्पन्नात झालेली वाढ चांगली असली तरी रोजगार निर्मितीच्या बाबत आपण मागे आहोत, असे डॉ. स्वामीनाथन म्हणाले.
अमेरिकेची अवघी २८ टक्के जनता ही शेतीवर अवलंबून असतानाही शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव व लाइफ सपोर्ट सिस्टीम अमेरिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तेथील शेतकरी हा खऱ्या अर्थाने सधन बनला आहे, असे डॉ. स्वामीनाथन म्हणाले.
केंद्र सरकारने शेतकरी आयोग नेमला. त्याचा अहवाल सरकारला दिला आहे. शेती प्रयोगशाळा बनायला हवी आणि रोजगार निर्माण होण्यासाठी या अहवालाची मांडणी करण्यात आली आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाच्या नफ्यातील ५० टक्के वाटा मिळायला हवा असे अहवालात सुचविले आहे, असे डॉ. स्वामीनाथन म्हणाले. सिंधु अ‍ॅग्रो फेस्टला डॉ. स्वामीनाथन यांनी भेट दिली. भारत कृषी रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरवदेखील करण्यात आला.
दरम्यान अभिनेता भरत जाधव यानेदेखील सिंधु अ‍ॅग्रो फेस्टला भेट दिली. कोकणातील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहन अभिनेता भरत जाधव यांनी केले.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकरी केंद्रस्थानी मानून विकास आराखडा बनविला जात असल्याचे सांगितले, तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीही भेट दिली.
या अ‍ॅग्रो फेस्टमध्ये गोआधारित सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगताना भाजीपाला उत्पादनाबाबत माहिती दिली गेली. आंबा बागायतीत पपई व शेवगा घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr m s swaminathan speech about farmer condition
First published on: 22-02-2016 at 00:54 IST