कर्जत : येथील रहिवासी व सध्या बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात संशोधक व प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. प्रशांत मुरूमकर यांची प्रतिष्ठित वैज्ञानिक सल्लागार मंडळात (Roll of Scientific Advisers) नियुक्ती झाली आहे.
भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत पेटंट, डिझाइन आणि ट्रेड मार्क महानियंत्रक कार्यालयाने ही निवड केली असून, ही नियुक्ती पेटंट अधिनियम १९७० च्या कलम ११५ व पेटंट नियम २००३ च्या नियम १०३ अंतर्गत करण्यात आली आहे.
वैज्ञानिक सल्लागार मंडळात जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, यांत्रिकी व विद्युतशास्त्र यांसारख्या गुंतागुंतीच्या पेटंट प्रकरणांवर मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असतो. त्यात डॉ. प्रशांत यांची निवड ही भारताच्या पेटंट व्यवस्थेला मोठी ताकद देणारी ठरली आहे.
फार्मसी व पीएचडी पदवीधारक असलेले डॉ. मुरूमकर औषधनिर्मिती, औषधी रसायनशास्त्र व संगणकीय औषध डिझाइन क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी क्षयरोग, कर्करोग, मलेरिया, लठ्ठपणा व अल्झायमर यांसारख्या रोगांवरील उपचारांसाठी अनेक पेटंट मिळवले आहेत. तसेच स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट व अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ऊटाहा येथेही संशोधनाचा अनुभव घेतला आहे.
त्यांच्या संशोधन व वैज्ञानिक समर्पणाबद्दल त्यांना ICMR आंतरराष्ट्रीय फेलोशिप, तसेच American Chemical Society च्या बैठकींसाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. मुरूमकर यांनी AICTE, DST-SERB आणि UGC यांसारख्या संस्थांच्या संशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
वैज्ञानिक सल्लागार मंडळातील डॉ. प्रशांत यांचा समावेश हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान असून, यामुळे भारताच्या पेटंट क्षेत्राबरोबरच एमएसयू बडोदाच्या शैक्षणिक गुणवत्तेलाही नवी उंची मिळाली आहे.