राजापुर – दारुच्या नशेत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून भावालाच भावाने आणि पुतण्याने ठार मारल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राजापुर तालुक्यातील नाटे, ठाकरेवाडी येथील दोघांना या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नाटे, ठाकरेवाडी येथे ही घटना घडली. स्वप्नील ठाकरे (वय ४५) रा. नाटे ठाकरेवाडी, याला भाऊ चंद्रकांत ठाकरे व पुतण्याने दारुच्या नशेत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून
जीवे ठार मारल्याची घटना शुकवारी घडली.

नाटे, ठाकरेवाडी येथील स्वप्नील ठाकरे हे रत्नागिरी येथे वास्तव्याला असून ते गुरूवार दि.१५ मे रोजी आपल्या लहान मुलासह नाटे गावी येथे आले होते. गुरूवारी रात्री त्यांनी त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत ठाकरे व पुतण्या याच्यासमवेत मद्यप्राशन केले. यावेळी त्या तीघांमध्ये कीरकोळ कारणावरून शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर या रागातून भाऊ चंद्रकांत आणि पुतण्या यांनी पुन्हा ठाकरे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघांनी स्वप्नील ठाकरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील संशयित दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. मात्र नाटे ठाकरेवाडी येथे घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.