परभणीचे खासदार दुधगावकर राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याच्या चर्चेने मराठवाडय़ात जोर धरला आहे. सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे बोलले जाते. गेल्या निवडणुकीत दुधगावकरांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांना धूळ चारताना ‘गुरू-शिष्य’ लढाईत सेनेचा भगवा फडकावला. परभणी लोकसभेची जागा इच्छा प्रामुख्याने आमदार संजय जाधव व मीराताई रेंगे, हरिभाऊ लहाने, जालन्याचे माजी मंत्री खोतकर यांनी व्यक्त केली. जालन्याचा मोठा भाग परभणी लोकसभेत येतो.
‘आदर्श’ प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न देता आता सरकारनेच राजीनामा देऊन पायउतार व्हावे व निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिले.
शिवसेनेला मराठवाडय़ातील वाटय़ाच्या चारही जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धार व्यक्त करताना सेनेत यापुढे लोकशाहीवर नाही, तर आदेशावर भर दिला जाईल. कार्यकर्त्यांनी मार्गदर्शनाची वाट न वाटता लोकसभेच्या तयारीला लागावे, असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. सेनेचे परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांच्या गैरहजेरीत परभणीतून पक्षातर्फे नवीन उमेदवार देण्याचे सूतोवाच ठाकरे यांनी केले.
बैठकीस दुधगावकर यांच्या गैरहजेरीची कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. दुधगावकरांच्या संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबतही तर्कवितर्क होत होते.
‘मिस्टर क्लीन’ समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अहवाल फेटाळणे योग्य नाही. त्यांच्या आजूबाजूचे किती ‘मिस्टर क्लीन’ आहेत, हेही एकदाचे कळू द्या. धुतल्या तांदळासारखा कारभार असेल, तर अहवाल प्रसिद्ध करा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. काँग्रेसकडे आता पक्षनेतृत्व, तसेच सरकार चालविण्यासाठी एकही चेहरा नाही. एवढेच काय, मोठा व छोटा नेताही राहिला नाही, सत्ताधाऱ्यांची मात्र नाटके सुरूच आहेत. घोटाळे त्यांनीच करायचे, चौकशीही त्यांनीच करायची, हे जनतेला चांगले कळले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
औरंगाबाद व परभणीतील लोकसभा जागांच्या संदर्भात सेनेच्या सद्य:स्थितीचा ठाकरे यांनी आढावा घेतला. सेनेचे सचिव अनिल देसाई, उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, लक्ष्मणराव वडले, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर (औरंगाबाद) व रवींद्र मिर्लेकर (परभणी) यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींशी पक्षाच्या धोरणावर परस्पर बोलू नका, अशी तंबीही ठाकरे यांनी दिली.
बैठकीस पत्रकारांना प्रवेश नव्हता. बैठकीनंतर मात्र उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.